जिल्ह्याचे अमृत कलश दिल्ली येथील अमृतवाटिकेसाठी रवाना

अमृत कलश पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती

यवतमाळ – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती माझा देशअभियानांतर्गत शहरात जिल्हास्तरीय अमृत कलश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा पोस्टल मैदान ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप करुन जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष यांच्या उपस्थितीत अमृत कलश नेणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवून मुंबईला रवाना करण्यात आले. या पदयात्रेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, महिला व बाल कल्याण अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंता प्रल्हाद उपाध्ये, माहिती अधिकारी पवन राठोड आदी अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नेहरू युवा केंद्रांचे विद्यार्थी, महिला ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या हस्ते प्रत्येक तालुक्याचा अमृत कलश प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. या अमृत कलश यात्रेत जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे १६ आणि नगरपरिषदांचा एक असे १७ अमृत कलश घेवून ३४ स्वयंसेवक मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होतील. तेथून विशेष रेल्वेने दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अमृतवाटिका निर्मिती कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत नोडल अधिकारी म्हणून सहायक गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही अमृत कलश पदयात्रा शिस्तबद्धरितीने काढण्यात आली. या पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना विशेष गणवेश देण्यात आले होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थीनींनी लेझीमचे सादरीकरण केले. या अमृत कलश यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top