‘गवळाऊ’ जातीच्या गोवंशाचा आतबट्ट्याचा लिलाव बोंबलला

अमरावती-
झपाट्याने दुर्मिळ होत असलेल्या ‘गवळाऊ’ जातीच्या 67 नर वासरे आणि 28 गायींचा कवडीमोल भावात लिलाव करण्याचा पोहरा पशु संवर्धन प्रक्षेत्राचा प्रयत्न, गोशाळा महासंघाच्या समयोचित हस्तक्षेपामुळे धुळीस मिळाला आहे.आता नोंदणीकृत गोशाळा तसेच शासकीय संस्थांना याबाबत सूचित करण्यात आले असून येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत ऑफसेट किंमतीने हे पशुधन विकत घेण्याबाबत जाहीरपणे कळविण्यात आले आहे.

गोशाळा महासंघाच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष विजय शर्मा व अन्य मंडळीने याबाबत उच्च स्तरावर तक्रार करून गेल्या आठवड्यात होणारा हा लिलाव थांबविला होता. ‘गवळाऊ’ जातीचे हे ब्रीड झपाट्याने संपुष्टात येत असल्याने राज्य सरकारने गवळाऊ ब्रीड च्या वाढीसाठी विशेष प्रयत्न चालविले आहेत.त्या अंतर्गत पोहरा येथे गवळाऊ ब्रीड साठी विशेष केंद्र स्थापन करण्यात आले.गवळाऊ जातीचे बैल अधिक काटकव शेतीसाठी अधिक उपयुक्त तसेच गवळाऊ गायीचे दूध पांढरे शुभ्र, अधिक फॅट असणारे असल्याने गीर, साहिवाल, राठी इत्यादी प्रमाणेच गवळाऊ गोवंश वाढविण्याचा शासनाचा प्रयक्तन आहे.मूळ वर्धा जिल्ह्यातील हे वाण आता काही मोजक्या तालुक्यात अस्तित्वात आहे.गवळाऊ प्रजनन विशेष केंद्राद्वारे हे वाण अधिकाधिक शेतकरी व गोपालकांकडे पोहचावे, गवळाऊ पशुधनाची संख्या वाढावी, शुद्ध गवळाऊ पशुधन वाढल्यास नव्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन त्यावर अधिक प्रयोग करता येतील, असा शासनाचा प्रयत्न व त्यानुरूप योजना आहे.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या नागपूर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या 17 जुलै 2023 च्या पत्रानुसार त्याच अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. मात्र, पोहरा येथील प्रक्षेत्र व्यवस्थापकांनी त्याकडे डोळेझाक करीत आणि व्यापक प्रसिद्धी न करता गेल्या आठवड्यात हा लिलाव आयोजित केला होता.फारशी प्रसिद्धी न झाल्याने मोजकेच खरेदीदार उपस्थित व्हावेत आणि संगनमताने हा आतबट्ट्याचा व्यवहार पूर्ण करता यावा, असा हेतू त्यामागे असावा असे गोशाळा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.त्यांना या लिलावाची कुणकुण लागताच त्यांनी पोहरा प्रक्षेत्र येथे धाव घेतली आणि प्रश्नांची सरबत्ती करून पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची नाकेबंदी केली.त्यामुळे त्या दिवशीच लिलाव स्थगित करणे या अधिकाऱ्यांना भाग पडले.

दरम्यान, गोशाळा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबत उच्च स्तरावर तसेच पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेही तक्रारी दाखल केल्या. पालकमंत्र्यांनी हा अतिशय गंभीर विषय असून आपण गोशाळा महासंघाच्या अध्यक्षासोबत बोलून तो तात्काळ मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते.

या तक्रारीचा फायदा झाला असून आता 20 ऑक्टोबरच्या पत्रानुसार, पोहरा प्रक्षेत्राचे व्यवस्थापक डॉ.रवींद्र खाजोने यांनी या गवळाऊ जातीच्या नेमक्या पशुधनाची संख्या तसेच ते ऑफसेट किंमतीला मान्यताप्राप्त गोशाळा व शासकीय संस्थांना 31 ऑक्टोबर पर्यंत खरेदी करता येतील असे जाहीर केले आहे. या पत्रात त्यांनी गोशाळा महासंघ, विदर्भ प्रांत यांनी 16 ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रार अर्जाचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच या लिलावबाबत पशुसंवर्धन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अवगत केले आहे.त्यामुळे शुद्ध ‘गवळाऊ’ जातीचे हे पशुधन वाजवी किमतीत घेण्याची व ते जतन करून वाढविण्याची संधी या भागातील शेतकरी व गो पालकांना मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top