मेळाव्यातून हरविलेली दिव्यांग मुलगी नागपूर येथे आढळली

वर्धा पोलिसांच्या शोध मोहिमेला यश

वर्धा-
चरखागृह सेवाग्राम येथे समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने आयोजित दिव्यांग मेळाव्यातून हरविलेली मतीमंद दिव्यांग मुलगी नागपूर येथे आढळून आली. वर्धा पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी सर्वत्र शोध मोहीम राबविली होती. पोलिसांच्या या मोहिमेस अखेर यश आले.

दिव्यांग मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग आल्याने प्रचंड गर्दी झाली होती. या मेळाव्यातच पारडी, ता.कारंजा येथील मुलीची आई रेहनाबी शेख चांद आपल्या मतीमंद मुलगी रुकसाना परविन शेख चांद हिच्यासह मेळाव्यात आली होती. मुलीची आई नोंदणी करित असतांना मुलगी कोणालाही न सांगता निघून गेली होती. आईने मुलीगी हरविल्याची तक्रार सेवाग्राम पोलिस स्टेशनला दाखल केली होती.

तक्रारीवरुन मिसींग नोंद करून तपास सुरु करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सेवाग्रामचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी मुलीच्या शोधाकरिता विशेष पथक तयार करून शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतू मुलगी आढळली नाही. शोध पथकास नागपूर येथे पाठविण्यात आले होते. अखेर ही मुलगी नागपूर येथे सिताबर्डी परिसरात बसस्थानकच्या बाजूला आढळून आली. मुलीस पोलिस स्टेशनमध्ये आणून तिला तिच्या आई वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले.

मुलीचा युद्ध पातळीवर शोध घेण्याची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार चंद्रशेखर चकाटे याच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक श्री.चव्हाण, सहाय्यक फौजदार दिलीप कडू, हवालदार हरिदास काकड, पोलिस नायक गजानन कठाणे, मनोज लोहकरे, योगिता जुमडे, शिपाई अभय इंगळे, पवन झाडे, चालक कैलास चौबे यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top