मातृभूमिच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलीसांना मानवंदना

पोलीस स्मृती दिन : जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शहिदांना अभिवादन

यवतमाळ –
मातृभूमिच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलीसांना आज पोलीस स्मृतीदिनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली.
कर्तव्यावर असतांना शहीद झालेल्या पोलीसांना अभिवादन करण्यासाठी पोलीस स्मृती दिनाचे आयोजन पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, अतिरिक्त कारागृह अधिकारी सुरेंद्र ठाकरे व जिल्हा पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शहिदांना अभिवादन केले.
पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, कर्तव्यावर असतांना हौताम्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनातर्फे २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. याच दिवशी १९५९ साली जम्मू काश्मीर येथील लडाख हद्दीत हॉटस्प्रिंग येथे केंद्रीय सुरक्षा दलाचे १० जवान गस्तीवर असतांना चिनी फौजेने हल्ला केला. अपूरे मनुष्यबळ व शस्त्रास्त्रे असूनही स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या जवानांनी अतिशय शौर्याने प्रतिकार केला. देशाच्या रक्षणासाठी शत्रुशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले. या वीरांच्या स्मरणार्थ हॉटस्प्रिंग येथे संपूर्ण भारताच्या पोलीसांनी स्मारक उभारले. यावर्षी संपूर्ण देशात पोलीस अधिकारी-कर्मचारी अशा एकूण १८८ जवानांनी मातृभूमिच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती दिली. या शहीद पोलीसांना वंदन करतो, अशा शब्दांत जिल्हा पोलीस अधीक्षक डॅा. पवन बन्सोड यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.
यावेळी एपीआयटी गोपाल उपाध्याय, एपीआय शुभांगी गुल्हाने यांनी नाव वाचन केले. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रकाश देशमुख यांनी तर परेड संचालन आरपीआय भास्कर शेंडे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top