इस्रोचं गगनयान चाचणी उड्डाण यशस्वी

बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. टेस्ट व्हेईकल (TV-D1) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे आज १० वाजता यशस्वी करण्यात आले. ‘गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात येणार आहे. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.

चांद्रमोहिम आणि सूर्यमोहिमेपक्षा खर्चिक आणि भारताची एक महत्त्वाकांक्षी मोहिम म्हणजेच गगनयानचं चाचणी उड्डाण आज सकाळी रद्द करण्यात आलं होतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून उड्डाणासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. चाचणी उड्डाण TV-D1 लॉन्चिंगसाठी तयारही ठेवण्यात आलं होतं. मात्र ते लॉन्च होण्याच्या पाच सेकंद आधीच उड्डाण रद्द करण्याची सूचना देण्यात आली होती. सध्या असलेल्या खराब हवामानामुळे हे चाचणी उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते.

इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रक्षेपण आज सकाळी ८:०० वाजता श्रीहरिकोटा चाचणी श्रेणीतून करण्याचे नियोजित केले होते. मात्र, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी ८.४५ करण्यात आली. परंतु तरीही लिफ्ट ऑफ करण्याचा प्रयत्न होऊ शकला नव्हता. इंजिनचे प्रज्वलन ठरल्याप्रमाणे झाले नाही. त्यानंतर दुरुस्त करून लवकरच लॉन्च शेड्यूल करू, असे एस. सोमनाथ यांनी सांगितले. यानंतर आज दहा वाजताच हे उड्डाण पुन्हा नियोजित करुन यशस्वी करण्यात आले आहे.

इस्रोकडून केल्या जाणाऱ्या या चाचणी मोहिमेला टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे, भारतीय अंतराळवीर यानाला पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू मॉड्यूल आणि क्रू रेस्क्यू सिस्टमच्या सुरक्षा मानकांचा अभ्यास करणं हा या मोहिमेमागचा उद्देश आहे, असं इस्रोने सांगितलं. सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, मोहिमेदरम्यान काही चूक झाली, तर भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्यासाठी ही चाचणी असणार आहे. २०२४ मध्ये आणखी अशाच काही चाचण्या केल्या जातील. गगनयान मोहीम २०२५ मध्ये अंतराळवीरांना घेऊन प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top