भारताच्या कर्णधाराला नवव्या षटकातच वापरावे लागले सहा गोलंदाज

हार्दिक पांड्याला दुखापत तर बांगलादेशची तुफान फलंदाजी

पुणे : क्रिकेट वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना आज पुण्यामध्ये सुरु आहे. यात बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दृष्टीने हा निर्णय हितकारकच आहे. पण भारतालाही आता सावढगिरीने खेळण्याची गरज दिसत आहे. कारण बांगलादेशने तुफान फलंदाजी करत पहिल्या नऊ षटकांतच अर्धशतक ठोकले आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माला या फलंदाजांना रोखण्यासाठी सहा गोलंदाज वापरावे लागले आहेत.

दुखापतीमुळे बांगलादेशचा नियमित कर्णधार शाकीब अल हसन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही. नजमुल हुसैन शान्तो सध्या कर्णधाराची भूमिका निभावत आहे. त्यामुळे तगड्या शाकीबच्या अनुपस्थितीत बांगलादेशला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. असं असलं तरी बांगलादेशने दमदार खेळायला सुरुवात केली आहे.

याउलट भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मात्र दुखापतीमुळे नवव्या षटकाच्या अर्ध्यात मैदानाबाहेर पडला. फलंदाजाने मारलेला चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला. त्यामुळे ते षटक विराट कोहलीने पूर्ण केले. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शेवटची गोलंदाजी २०१७ मध्ये केली होती. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या कोलंबो येथील सामन्यात त्याने गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता तो थेट बांगलादेशविरूद्ध वर्ल्डकपमध्ये पुण्यात गोलंदाजी करत आहे. तर पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव बदली खेळाडू म्हणून आला आहे. मात्र, आपला हुकुमी एक्का पांड्या मैदानाबाहेर बसल्याने भारतीयांची धाकधूक वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top