अखेर तापींची उचलबांगडी : राज्याच्या ग्राम विकास विभागाने काढले आदेश 

जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिगंबर लोखंडे यांची वर्णी 

अकोला :- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या महिला ग्राम सेविकेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या कालिदास तापी यांची उचलबांगडी करीत त्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिगंबर लोखंडे यांची वर्णी लागली आहे. त्या संबंधी गुरुवारी ता. ११ जुलै रोजी राज्याच्या ग्राम विकास विभागाने आदेश काढले आहे. 

अकोला जिल्हा परिषदेच्या अकोट पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला ग्राम सेविकेच्या विनयभंग केल्याच्या आरोपाखाली जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तात्कालीन प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांच्यावर शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात भांदवी कलम ३५४ ( अ ), ३५४ ( ड) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तापी रजेवर होते. सदर प्रकरणी अकोला जिल्हा परिषदेची प्रतिमा संपूर्ण राज्यात मलिन झाली होती. तरी मात्र याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन आणि स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मौन धारण करून होते. याप्रकरणी राज्याच्या विशाखा समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र त्यांच्याकडून सुद्धा सदर प्रकरण अतिशय कासवगतीने हाताळणे सुरू होते. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही काही होत नसल्याचे चित्र पीडित ग्राम सेविकेला दिसत होते. तर दुसरीकडे २ जुलै रोजी तापी यांनी पदभार घेताच त्याच कालावधीत पीडित ग्राम सेविकेला जिल्हा परिषदेच्या अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात घडलेल्या प्रकाराचे कारण समोर ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व प्रकरणामुळे पीडितेने ता. ५ जुलै रोजी अकोट तालुक्यातील पोपट खेड धरणात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, सुदैवाने उपस्थितांनी पीडितेला धरणाबाहेर काढले अन् उपचारार्थ अकोला पाठविण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर त्याच दिवशी पीडित ग्राम सेविकेची विनंतीनुसार पातूर पंचायत समिती अंतर्गत बदली करण्यात आली होती तर तापी यांच्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांना पदभार देण्यात आला होता. याप्रकरणी एवढ्या दिवसांपासून मौन धारण करून बसलेले सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी अचानक रौद्र रूप धारण करत बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांना धारेवर धरत तापी यांच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात आली नाही ? याचा जाब विचारत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याप्रकरणी कारवाई करण्याकरिता गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. 

याप्रकरणी अखेर राज्याच्या ग्राम विकास विभागाने स्वतः जातीने लक्ष घालत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दिगंबर लोखंडे यांची जिल्हा परिषद अकोला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली असल्याचे आदेश काढले. 

‘जनमाध्यम’चा सतत पाठपुरावा 

या प्रकरणी ग्राम सेविकेने जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस विभाग यांना तक्रार दिल्यापासून नियमित घडत असलेल्या घडामोडीवर प्रकाश टाकण्याचे काम ‘जनमाध्यम’ ने केले. ग्राम सेविकेने केलेल्या तक्रारी, अधिकारी कर्मचारी कृती संघटना यांच्यामार्फत झालेले निवेदन बॉम्ब यांसह नियमित घडत असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा ‘जनमाध्यम’ने केला हे विशेष !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top