क्रीप्टो करन्सीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक

अकोल्यातील चार युवकांसह अमरावतीतील एका युवतीला ठोकल्या बेड्या

अमरावती/प्रतिनिधी- शेअर मार्केट व क्रीप्टो करंसीत गुंतवणूक करीत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती सायबर पोलिसांनी अकोल्यातील चार युवकांसमवेत अमरावती शहरातील एका युवतीला बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या फिर्यादिला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मॅसेज करून शेअर मार्केट व क्रीप्टो करन्सी मध्ये कोटयावधी रुपये नफा कमविण्याचे आमिष देण्यात आले. सदर आमिषाला बळी पडत फिर्यादिने आपल्या विविध बँक खात्यातून संशयित आरोपींच्या विविध बँक खात्यात तब्बल १ कोटी ५३ लक्ष ७७ हजार आठशे चोवीस रुपये आरटीजीएस द्वारे पाठविले असल्याचे तक्रारीत नमूद केले. सदर तक्रारीवरून सायबर पोलिसांनी याप्रकरणी भांदवी कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१ सहकलम ६६ ( क ), ६६ ( ड) आयटी ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल करीत तपासला सुरुवात केली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषनावरुन पोलिसांनी अमरावती शहरातील रहिवासी असलेल्या युवतीला ताब्यात घेत तिची विचारपूस केली. चौकशी दरम्यान अकोल्यातील चार युवकांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे उलगडून आल्याने पोलिसांनी अकोल्यातील चार युवकांना ताब्यात घेतले. पाचही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.संशयित आरोपींमध्ये यांचा समावेश अमरावती शहरातील दक्षता संजय डोंगरे सह अकोल्यातील शुभम गुलाये वय २३ वर्ष, गौरव शांतीलाल अग्रवाल वय २३ वर्ष, नमन गजानन डहाके वय २३ वर्ष, रवी राम सुभाष मौर्या वय ३३ वर्ष यांचा समावेश आहे.

मुद्देमाल जप्त

याप्रकरणी पाचही संशयित आरोपींकडून विविध बँकेचे पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड, रबर स्टॅम्प, मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहे.

आंतरराज्यीय बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर

कोटक महिंद्रा बँक गुजरात, बंधन बँक हैद्राबाद, फेडरल बँक गुजरात, पंजाब, तेलंगणा अश्या तब्बल १४ बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली असून तब्बल साडे सात लक्ष रुपयांची रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.

यांनी केली कारवाई

सदर कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने, अनिकेत कासार, शैलेंद्र अर्डक, पंकज गाडे, उल्हास टवलारे, सुधीर चार्जन, अपर्णा बंडे, प्रशांत मोहोड, सचिन भोयर, अनिकेत वानखडे, सुषमा आठवले यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top