विद्यापीठाचा भोंगळ कारभार संपेना….

युवासेनेने केले विद्यापीठात मूल्यांकन व शुल्क परताव्यासाठी आंदोलन

अमरावती/प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठांमध्ये उत्तरपत्रिका मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचे शुल्क परत करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी तीव्रतेने वाढत होत्या. याची दखल घेत 28 मे रोजी विद्यार्थी सेना (उ.बा.ठा.) शहर प्रमुख योगेश सोळंके व विभागीय सचिव सागर देशमुख यांनी विद्यापीठामध्ये शेकडो विद्यार्थ्यांसह धडक दिली.

यावेळी विद्यार्थी सेना शहर प्रमुख योगेश सोळंके यांनी प्राध्यापक मूल्यांकन करताना हलगर्जी बाळगतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना ०,२,३ असे गुण मिळतात व नंतर पुनर्मुल्यांकनामध्ये त्याच गुणांमध्ये २५ ते ४० टक्क्यांपर्यंत वृद्धी होते यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे असे प्रतिपादन केले यासोबतच अमरावती विद्यापीठ अध्यादेश क्र.१६/२००७ कलम २५ अन्वये पुनर्मूल्यांकनामध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त तफावत असल्यास दोषी मूल्यांकनकर्त्यावर कार्यवाही करण्याची तरतूद आहे पण हा अध्यादेश अस्तित्वात येण्यापासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या १७ वर्षांमध्ये एकाही मूल्यांकनकर्त्यावर हलगर्जी बाळगल्यामुळे कार्यवाही केल्या गेली नाही ही माहिती (माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झालेली ) प्र-कुलगुरू यांच्या समक्ष ठेवली व आजपर्यंत का कुठल्याही दोषी मूल्यांकनकर्त्यावर कारवाई करण्यात आली नाही असा सवाल प्रस्तुत केला ? कुलगुरू व परीक्षा संचालक यावर निरुत्तर होते, परीक्षा विभागच दोषी मूल्यांकनकर्त्याचा बचाव करते असा आरोपही त्यांनी केला.

या सोबतच पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण केलेल्या पण पुरवणी परीक्षेचा अर्ज अगोदर भरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमाप्रमाणे शुल्क परत केल्या जाते पण गेल्या दहा वर्षात विद्यापीठाने फक्त १६११ विद्यार्थ्यांना हे शुल्क परत केले आहे अशी माहिती समोर ठेवली . फक्त शैक्षणिक वर्ष २३-२४ मध्येच विद्यापीठात एकूण ८ लाख विद्यार्थी शिकत आहे आणि विद्यापीठाचा निकाल हा एका परीक्षा सत्राला सरासरी ७० टक्के एवढा लागतो सबब ३० टक्के विद्यार्थी म्हणजेच २.४० लाख विद्यार्थी दरवर्षी अनुत्तीर्ण होतात यापैकी निम्म्याच्या निम्मे म्हणजे ६० हजार विद्यार्थी जरी पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण होऊन पुरवणी परीक्षेचे शुल्क परत मिळवण्यास पात्र होत असेल आणि सरासरी परीक्षा शुल्क ७०० रुपये एवढा असेल तरी हा आकडा ४.२कोटी रुपये एवढा होतो म्हणजेच एका वर्षाला दोन सत्र मिळून ८.४ कोटी. अशा मध्ये विद्यापीठाकडून गेल्या दहा वर्षात विद्यार्थ्यांना फक्त ११.२७ लाख रुपये परत करणे ही लाजिरवाणी बाब आहे.

त्यामुळे अर्ज सादर करणारी व शुल्क परतावा करणारी व्यवस्था ही ऑनलाइन करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा त्यांना परत मिळू शकेल या आशयाचे निवेदन विद्यार्थी सेना शहर प्रमुख योगेश सोळंके यांनी प्रस्तुत केले व लवकरात लवकर या समस्यांचा तोडगा न काढल्यास विद्यार्थी सेना विद्यापीठात शिवसेना स्टाईल आंदोलन करेल असा इशाराही दिला.

यावेळी तिथे प्रथमेश नवरखेले, गजानन जामोदकर , पांडुरंग कोळेकर , कार्तिक डकरे, विजय लोहिया , प्रतीक अब्रूक, सुजित झंजाड , हर्ष धोटे ,प्रणव डाखोरे, विनेश पवार, भाविक कांबळे, साहिल ढोले, तन्मय कानडे, आयुष कुरळकर व इतर विद्यार्थी सेना पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top